बुलडाणा लोकसभेवर शिवसेनेचा भगवाच फडकणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लोणार / पंढरीनाथ डोईफोडे / विशाल सातपुते ●
शिवसंकल्प अभियानांतर्गत शिवसेना पक्षाची मिशन ४८ ची लोकसभा जाहीर सभा आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील खामगांव- जालना रेल्वेमार्गासाठी ५० टक्के हिस्सा राज्य सरकार देईल, लोणार सरोवर संवर्धनासाठी ३६९ कोटी रुपये आणि पेनटाकळी जलसिंचन प्रकल्पाला ५०० कोटी दिले आहेत, तसेच वैनगंगा- पैनगंगा नदीजोड योजनेला मंजुरी दिली जाईल असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्पष्ट केले.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार टिकावेत, धनुष्यबाण टिकावा यासाठी दीड वर्षांपूर्वी आम्ही वेगळा निर्णय घेतला. त्यामुळे आज अनेक शिवसैनिक आमच्या निर्णयाला पाठींबा देण्यासाठी सोबत येऊन जोडले जात आहेत.
वंदनीय शिवसेनाप्रमुख हे कार्यकर्त्यांना आपले मानायचे, तुम्ही कार्यकर्ते आहात म्हणून मी शिवसेनाप्रमुख आहे असं त्यांचं मत होतं. मात्र आजचे नेते मी आहे म्हणून तुम्ही आहात या मानसिकतेतून वागत आहेत. त्यामुळेच घरंदाज माणसाने घराणेशाहीवर बोलावे असे म्हणून त्यांनी सर्वसामान्य, गोरगरीब शिवसैनिकांचा जाहीर अपमान केला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेसशी यांनी सख्य केलं, सर्वसामान्य शिवसैनिकांवर अन्याय झाला तेव्हा यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. शिवसैनिकांच्या व्यथा वेदना यांचं त्यांना काहीच वाटत नव्हते, उलट त्यांना कायम घरगड्यासारखी वागणूक यांनी दिली. अंगावर केसेस घेऊन, लाठ्या काठ्या झेलून पक्ष आम्ही शिवसैनिकांनी वाढवला त्यामुळे आमच्यावर टीका करताना तुम्ही पक्षासाठी नक्की काय केलं ते सांगा असे जाहीर आव्हान दिले.
अयोध्येत राम मंदिर आणि काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचे धाडस मोदीजींनी दाखवले. तरीही आज त्यांच्यावर हे टीका करत आहेत, पण आगामी लोकसभेत हेच शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे यावेळी नमूद केले.
यावेळी शिवसेना नेते खासदार प्रतापरावज जाधव,आमदार संजय रायमूलकर,आमदार संजय गायकवाड,आमदार संजय सिरसाट,आमदार चंद्रकांत पाटील तसेच शिवसेनेचे सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी,शिवसेना जिल्हाप्रमुख,महिला आघाडी जिल्हाप्रमुख,युवासेना जिल्हाप्रमुख शिवसेना,युवासेना,महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटनांचे आजी-माजी शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक महिला भगिनी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.