आता अंगणवाडी सेवीका मार्फतच स्विकारल्या जाणार लाडकी बहीण योजणेचा अर्ज
लोणार लाईव्ह वृत्त : पंढरीनाथ डोईफोडे : ०७ सप्टेंबर २०२४
बुलढाणा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजणेच अर्ज आता गावातील अंगणवाडी सेवीका मार्फतच भरल्या जाणार असल्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाकडून नुकताच घेण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाकडून यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
या शासन निर्णयानुसार लाडकी बहीण योजनेसाठी दाखल होणाऱ्या अर्जांना मंजुरी देण्याची जबाबदारी केवळ अंगणवाडी सेविकांवर असेल. यापूर्वी या योजनेचे अर्ज मंजूर करण्याचं काम 11 प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आलं होतं. मात्र, आता केवळ अंगणवाडी सेविका अर्जांना मंजुरी देऊ शकतात. यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका आणि अंगणवाडी सेविका, “समूह संघटक-CRP (NULM, MSRLM व MAVIM)”, मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक आणि आपले सरकार सेवा केंद्र यांना होते. मात्र, नव्या शासन निर्णयानुसार आता केवळ अंगणवाडी सेविका अर्ज मंजूर करु शकतात.
गेल्या काही दिवसांमध्ये एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. आता या योजनेतील सप्टेंबरमधील अर्जांना केवळ अंगणवाडी सेविकांकडून मंजुरी दिली जाईल.