प्रतिकूल परिस्थितीत तांड्यावरचा पवन झाला सेट परिक्षा उत्तीर्ण;ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षांव 


लोणर लाईव्ह वृत्त : पंढरीनाथ डोईफोडे : ०७ ऑगस्ट २०२४

____________________________________________

तालुक्यातील बिबखेड येथील बंजारा तांड्यावरचा पवन अखेर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गणित विषयात सेट परिक्षा उत्तीर्ण झाला.त्याच्या या यशाबद्दल ग्रामस्थांकडून तसेच तो ज्या शाळेत कार्यरत आहे तेथील शिक्षक वृंदांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे.

गुरुकृपा उच्च माध्यमिक आश्रम शाळा साडेगाव, ता.जि. परभणी, येथे उच्च माध्यमिक शिक्षक या पदावर कार्यरत असलेले, बिबखेड या गावचे सुपुत्र पवनकुमार जाधव हे महाराष्ट्र शासनाची अतिशय अवघड समजली जाणारी SET (सेट) परीक्षा EXAM गणित विषयात उत्तीर्ण झाले. गावातून अतिशय हालाखीच्या परिस्थितीमधून आपल्या जिद्द , चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर अशा अवघड समजल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये पात्र होण्याचा बहुमान त्याने मिळवला आहे.नुकताच ते जेथे कार्यरत आहेत तेथील महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. होळे सर व सर्व सहकारी वृंद यांच्या वतीने महाविद्यालयामध्ये सरांचा भव्य सत्कार करण्यात आला.

Advertisement

यावेळी जाधव सरांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना सांगितले की माझ्या कुटुंबात शैक्षणिक पार्श्वभूमीचा लवलेशही नव्हता. माझे आई-वडील दोन्हीही अशिक्षित. सध्या माझ्या दुर्दैवाने माझे वडील ह्यात नाहीत. पण माझ्या प्रत्येक निर्णयांमध्ये ते माझ्यासोबत असत. शिक्षणाबाबत मनात मोठी आशा असायची पण परिस्थिती पुढे काहीही चालायचे नाही. मात्र तीव्र इच्छाशक्ती पुढे पाषाणालाही पाझर फूटतो असेच काही माझ्यासोबत घडत गेले. ज्या अतिशय प्रखड परिस्थिती मधून, आपण घेतलेले शिक्षण किती कष्टदायी होते यावर भाष्य करत असताना उपस्थित विद्यार्थी व इतर कर्मचारी यांच्या मनाचा ठाव घेणारे मनोगत सरांच्या अनुभवातून व्यक्त होत गेले,अतिशय कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा सतत प्रयत्न करीत राहिल्यास यशाला गवसणी घालता येते. हे सरांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले. सरांनी आपल्या या यशाचे सर्व श्रेय आपले आई-वडील,आजी, गुरुजन वर्ग आणि कठीण काळामध्ये सदैव सोबत असणाऱ्या सर्व सहकारी मित्रांना दिले. या कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक श्री वाघमारे सर यांनी केले व या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!