रस्त्यासाठी घाटबोरी येथील युवकांचे चक्क गटारात लोटांगण आंदोलन
लोणार लाईव्ह वृत्त : शिलवंत इंगळे : मेहकर
तालुक्यातील घाटबोरी गावात नागरिक विविध समस्यांनी त्रस्त असून गावातील रस्ते चिखलाने माखलेले आहेत. जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा रस्ता अतिशय चिखलमय झाल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाट लागली आहे. तरीही झोपेचे सोंग घेणाऱ्या ग्रामपंचायत सुस्तच आहे. गावातील नागरिक रस्त्यामुळे परेशान झाल्यामुळे अखेर कंटााळू स्वाभिमानी युवक अंकुश श्रीराम राठोड व राजू तुकाराम कुसळकर या युवकांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत कारभाराविरोधात आक्रोश करीत चक्क रस्त्यावर घाणीच्या गटारात लोटांगण घालत अनोखे आंदोलन करत ग्रामपंचायतची कुंभकर्णी झोप मोडण्याचा प्रयत्न केला आहे.
ग्रामपंचायतीच्या वेळकाढूपणामुळे आणि हेतुपुरस्सर दुर्लक्षामुळे घाटबोरी गाव आता समस्यांचे माहेरघर बनले आहे. तरीही निगरगट्ट ग्रामपंचायत प्रशासनाला रस्त्यावरील गटारात साधा दगड मुरुम टाकून रस्त्याची दुरुस्ती करता येत नसल्याने, आता ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात संपूर्ण गावकऱ्यांचा नाराजी सुर उमटत असल्यामुळे येथे स्वाभिमानी युवकांनी रस्त्याच्या गटारात घाणीच्या चिखलमय पाण्यात लोटांगण घातले आहे.
यावेळी बहुसंख्य नागरिक व शालेय विद्यार्थ्यांनी रस्ता झालाच पाहिजे अशा घोषणा देत आपला आक्रोश व्यक्त केला आहे.