देऊळगाव माळी येथे एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी तर , एक मोटर सायकल लंपास
लोणार लाईव्ह वृत्त : मेहकर (शिलवंत इंगळे) मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या देऊळगाव माळी येथे दिनांक 21 जूनच्या रात्री तब्बल चार ठिकाणी बंद असलेल्या घराचे कुलूप फोडून अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. यामध्ये रामेश्वर राजगुरू हे सासरवाडीला गेले होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरामधील रोख नगदी रक्कम व सोन्या चांदीची दाग दागिने मिळून चार ते साडेचार लाख रुपयांचे ऐवज लंपास केला. तर पांडुरंग केंदळे यांच्या घराचे सुद्धा कुलूप फोडून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना तेथे काहीही मिळून आले नाही. त्यानंतर काशिनाथ मगर टेलर यांच्या बंद घराचे कुलूप फोडून चोरी केली परंतु या घरांमध्ये सुद्धा त्यांना रिकामे हाताने परतावे लागले.
त्यानंतर विजय नारायण सुरूशे साताऱ्याला गेल्याचा फायदा घेत यांचे सुद्धा चोरट्यांनी घर फोडून नेमके काय चोरून नेले हे कळू शकले नाही. कारण त्यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. आणि नेमके घरात काय होते हे त्यांनाच माहीत. त्याचबरोबर गणेश भागवत मगर यांची एम एच 28 एक्स ५६ ५३ क्रमांकाची मोटरसायकल चोरट्यांनी चोरून नेली. तसेच बबन गाडेकर, व गिरे, यांची मोटरसायकल चोरण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडीचे हँडल लॉक न तुटल्यामुळे गाड्यांना नुकसान पोहचून गाड्या तेथेच सोडून दिल्या.
या संपूर्ण प्रकरणाचा मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार कोरडे साहेब, रामेश्वर रिंढे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहे.