प्रतापगड अभेद्य ठेवण्यात जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापारी यांची मोलाची कामगिरी
ग्रामीण भागातील दांडग्या जनसंपर्काचा फायदा
लोणार लाईव्ह वृत्त : पंढरीनाथ डोईफोडे : १७ जून
सलग चौथ्यांदा लोकसभेत पोहोचण्याचा विक्रम करणारे खासदार प्रतापराव जाधव यांनी या निवडणुकीत दिमाखात विजयी चौकार मारला, अगदी महायुतीचे तिकीट मिळवण्यापासून संघर्ष करावा लागला असताना ही निवडणूक अत्यंत अटीतटीची राहणार आहे याची जाणीव खा. जाधव यांना झाली होतीच , परंतु दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील दोन मातब्बर माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे व डॉक्टर संजय कुटे यांच्यासह मेहकर चे आमदार डॉ संजय रायमुलकर, बुलढाण्याचे संजय गायकवाड, चिखलीच्या श्वेताताई महाले, खामगावचे आकाश दादा फुंडकर या सर्व आमदारांनी प्रचाराच्या प्राथमिक टप्प्यातच आपापल्या मतदार संघांमध्ये जोरदार फिल्डिंग लावलेली असल्यामुळे खा. जाधवांची प्रचार यंत्रणा प्रभावी ठरली , या निवडणूकीच्या रणधुमाळीत शिंदे सेनेचे संघटन मजबूत ठेवत मित्र पक्षासोबत योग्य समन्वय ठेवण्याची जबाबदारी अर्थातच जिल्हा प्रमुख म्हणून प्रा. बळीराम मापारी यांचेवर होती, आपल्या स्वपक्षातील कोणत्याही कार्यकर्ता दुखावला जाणार नाही आणि मित्र पक्षातील सर्वाना सोबत घेत मानसन्मान देत निवडणूक कामात प्रत्येकाला सक्रिय करण्याचे मोठे काम प्रा. मापारी यांना करावे लागले.
त्यांना या सर्व कार्यात आ. संजय रायमुलकर यांचे योग्य ते सहकार्य आणि मार्गदर्शन लाभल्यामुळे निवडणुक संसाधनाची कमतरता जाणवली नाही ही सुद्धा एक जमेची बाजू ठरली, या निवडणुकीत प्रतापगडाचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळख असणारे बळीराम मापारी यांचे स्वपक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांसोबतच मित्र पक्षातील नेते व कार्यकर्त्यांसोबत असलेला जिव्हाळा सुद्धा दिसून आला.ग्रामीण भागातील जणतेशी विविध कामानिमित्त जोडलेली नाळ त्यांना याहीवेळी कामी आली. त्यामुळेच शिवसेना, भाजप राष्ट्रवादि मनसे या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत समन्वय साधुन प्रा. बळीराम मापारी यांनी प्रतापगड अभेद्य ठेवण्यात मोलाची कामगिरी बजावल्याचे दिसून आले.
जिल्हाप्रमुख आणि विश्वासू शिलेदार प्राध्यापक बळीराम मापारी आणि स्वपक्ष असलेल्या शिवसेनेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी अहोरात्र केलेली मेहनत खासदार जाधव यांच्याकडे विजयश्री खेचून आणणारी ठरली हॆ मात्र नक्की.