नंदिबैल संस्कृती लोप पावण्याच्या मार्गावर;गावागावात करावा लागतो अडचणींचा सामना;”चिमण्याकार”गणेश शिंदे यांच्याशी लोणार लाईव्हची खास बातचीत
‘नंदिबैलवाला ते चित्रपट’ गणेश शिंदे यांचा अविश्वसनीय प्रवास
लोणार लाईव्ह वृत्त Lonar Live News पंढरीनाथ डोईफोडे
‘नंदीबैल आला’ म्हटले की लहान थोर त्यांच्या दिशेने धाव घेवून त्यांची कला बघून,नंदीबैलाचा खेळ बघत बघत त्यांचे आशिर्वाद घेण्याचे त्यांना दहा पाच रूपये दक्षिणा देण्याचे दिवस आता राहीले नाहीत.याऊलट आता कुठल्याही गावात गेले की राहण्याच्या जागेपासून अडचणींचा सामना करावा लागतो. जमिनीवाले नुकसान, चोरीच्या भीतीने शेतात जागा देत नाहीत. गावात दारूडे धमक्या देतात, बेजार करतात, टोमने मारतात ते वेगळेच. यातुनही मिळणाऱ्या चार पाचशे रूपयातून काय खावे आणि काय ल्यावे अशी खंत चिमण्या चित्रपटात मुख्य भूमिका करणाऱ्या गणेश विश्वंभर शिंदे यांनी लोणार लाईव्हशी बोलताना व्यक्त केली.
शिंदे मुळचे नांद्रा धांडे ता.मेहकरचे.घरची परिस्थिती बीकट.वडील गावोगावी जावून नंदिबैल खेळ करणारे. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी गणेश शिंदे यांच्या वाट्याला हे जीणं आलं. भटकंतीमुळे पहिला वर्ग सुद्धा शिकता आला नाही.चिमण्या त्यांचा नंदीबैल. त्याच्याविषयी सांगताना गणेश थकत नाहीत. पंधरा वर्षापूर्वी सताराशे रूपयात गुजरातवरून हा नंदिबैल आणल्याचे ते सांगतात. बैलाला प्रशिक्षण देण्यासाठी शिखर शिंगणापूर मोठा महादेव येथे जवळपास अडिच तीन वर्ष ठेवावे लागले. एकदा का या मुक्या जीवाला आपली आणी आपल्याला त्याची भाषा कळायला लागली की, काही अवघड नाही. गावात प्रवेश करताना काही नियम असतात, वेशीपासून गावातील मुख्य रस्त्याने ढोल वाजवत जाणे.मारोतीच्या मंदिराजवळ नंदिला साज चढवणे. त्यानंतर खो खो,कबड्डी,चारी पाय अंगावर घेणे,माणसं ओळखने आणि सासु सुनेची जुगलबंदी सारखे खेळ दाखविल्या जातात. लोक आपापल्या परिणे पैसे धान्य देतात.परंतू हल्ली कुणी फार काही देत नाही. दिवसाला किती कमावता असे विचारल्यावर त्यांनी आपले मावसभाऊ शांतीराम सुरडकर यांना आज मिळालेले पैसे दाखवायला सांगीतले. शांतीराम आणि गणेश सोबत खेळ दाखवतात.शांतीराम यांनी आमच्या समोरच पैशाची वाटणी केली. दोघांच्या वाट्यावर चारशेच्या आसपास रूपये आलेले. त्यात नंदिबैलाचा खर्च १०० रूपये उर्वरित पैशात भागवावे लागते.
गावात काही त्रास होतो का असे विचारल्यावर त्यांनी समस्यांचा पाढाच वाचला अगदी राहण्याच्या जागेपासून, घोडे चरणे, चोरीचे आरोप ते गावातील पेताडांनी आम्हालाच दारूला पैसे मागितल्याचे अनुभव त्यांनी कथन केले. काही अतीहुशार तर आम्हाला काहीही बोलतात, टिंगल करतात. आम्ही सहन करतो पण आमचीच मुल आता नव्या पिढीची आहेत त्यांना खूप राग येतो. हा धंदा बंद करायला सांगतात. नाहीतर सोबत यायला टाळतात.गणेश शिंदे यांचा मुलगा मनोज अकराविला देऊळगाव माळी येथील महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालयात शिकतोय. दहाविला त्याला ८३ % गूण मिळालेत. पुढे पोलीस व्हायची त्याची ईच्छा आहे. नोकरीला लागल्यावर आई बाबांना हा व्यवसाय बंद करायला लावणार असे तो म्हणतो.
पहिला वर्ग शिकला नाही,अभिनयाचा अनुभव नाही मग चित्रपटात काम कसे मिळाले यावर त्यांनी हसत काही प्रश्नांचा उलगडा केला. तुमच्यासारखेच एक पत्रकार अमरावतीला नंदिबैल खेळ करत असताना भेटले.माझा फोटो काढला,तुम्हाला पेपरात छापतो म्हणाला. त्यावेळी मला फारस काही वाटल नाही. काही दिवसांनी मला चित्रपट दिग्दर्शक गणेश जाधव यांचा फोन आला.नंदिबैल जीवनावर एक चित्रपट काढणार आणि तुमचा चिमण्या आणि तुम्ही दोघेही तयार राहा म्हणून सांगीतले. सुरूवातीला आनंदही झाला आणि घाबरलोही. कधी स्वप्नातही चित्रपटात काम करण्याचा विचारही केला नव्हता. अखेर तारीख ठरली आणि संभाजीनगर येथे भेटलो. भेट सकारात्मक झाली. करार झाला आणि आम्ही मुंबईला गेलो. पैठण,पनवेल,पुणे, नवी मुंबई या ठिकाणी चित्रपटाचे चित्रीकरण झाले. बऱ्याचदा माझ्यापेक्षा माझा चिमण्या चांगला अभिनय करायचा. त्याने माझ्यापेक्षा खूप कमी रिटेक घेतले. चित्रीकरण पूर्ण झाले परंतू मधे कोरोना आल्याने अडचणी आल्या.बारा महिण्यांपूर्वी हा चित्रपट प्रदर्शित झाला.ब-यापैकी चालला. चित्रपटात काम करून दोन पैसे मिळाले, नाव मिळाल पण जीवाची फरफट अजुनही थांबलेली नाही. काही पैश्यातून घर बांधले, काही पैसे आजारी मावसभावाला लावून त्याला कँसर सारख्या गंभीर आजारातून वाचवल. हे सार ह्या नंदिबैलामुळे शक्य झाल. आता एका मालीकेत काम मिळणार असल्याची आशादायी बातमीही त्यांनी आम्हाला सांगितली.
नंदिबैलाविषयी बोलताना त्यांनी काही अपरिचित गोष्टी सांगितल्या. आमच्या घरात एखादा माणूस गेला तर तेरवीनंतर चुल पेटते परंतू आमचा बैल गेला तर महिनाभर चुल पेटत नाही. हा जवळ असताना आमच्या अंगाला हात लावण्याची कुणाची ताकत नाही. एक दिवस बैल दिसला नाही तर हुर हुर वाटते.त्याच्या गळ्यातील घुंगरमाळांचा आवाज सारखा कानात घुमत असतो.
गणेश शिंदे सद्ध्या लोणार तालुक्यातील गावागावात नंदिबैल चा खेळ दाखवत फिरत आहेत. त्यांच्याकडे बघितल्यावर हा माणूस एक नट आहे असे कदापिही वाटणार नाही परंतू यु ट्युबवर जावून चिमण्या बघितला तर आपल्याला त्यांच्यातील गुणी कलावंताची ओळख झाल्याशिवाय राहणार नाही, एवढे मात्र खरे.