लॉकडाउनमुळे नोकरी गेली;उभारला स्वतःचा व्यवसाय;हॉटेल व्यवसायातून राठोड दाम्पत्याची गगनभरारी
महिन्याकाठी होतेय लाखाची उलाढाल
लोणार लाईव्ह वृत्त । पंढरीनाथ डोईफोडे
लॉकडाउनमुळे अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली.कुणी आपला जीव गमावुन बसले तर कुणाच्या नोकऱ्या गेल्या. यातून काहींना सावरता आलं तर काहींची पार वाताहात झाली.असाच प्रसंग तालुक्यातील देउळगाव कुंडपाळ येथील भारत राठोड व पूजा राठोड यांच्यावरही ओढवला. त्यांना आपली लाखोची नोकरी सोडावी लागली परंतू त्यांनी खचून न जाता स्वतःचा व्यवसाय उभा केला. आज ते हॉटेलच्या व्यवसायातून महिन्याकाठी लाखोची उलाढाल करत आहेत.
लोणार तसे शहरवजा खेडेगाव.एक जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर सोडले तर फारसा काही विकास नाही. ना मोठमोठे उद्योग ना व्यवस्थित हॉटेल्स.हीच गोष्ट हेरून भारत राठोड यांनी आपली सहचारिणी पुजा यांना विश्वासात घेवून आपल्या वडिलोपार्जित जमीनीवर हॉटेल व्यवसायास सुरूवात केली. चुलीवरचे घरगुती चविष्ट जेवन आणि तेवढ्याच आपुलकीचे दोन शब्द यामुळे अल्पावधीतच हॉटेल तुळजाई नावारूपास आली. अर्थात यात त्यांची मेहनत आणि चिकाटी होतीच. लोणार मंठा रोडवर मोक्याच्या ठिकाणी,अगदी शेतातील वातावरणाचा आनंद येथे मिळत असल्याने पंचक्रोशीतील खवय्यांची गर्दी नेहमीच येथे दिसून येते. गवती झोपड्या, फुला फळांची झाडे, वेली आणि लहान मुलांना खेळण्या बागडण्यासाठीची सारी व्यवस्था राठोड यांनी केली.
आज लोणार परिसरच नव्हे तर वाशिम,जालना आणि बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा हॉटेल तुळजाई नावलौकिक मिळवत आहे.वयाच्या अवघ्या पस्तिशीत राजकारण व समाजकारणातही ते मागे नाहीत. युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष मेहकर लोणार, VJNT महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच राष्ट्रीय बंजारा टायगर प्रदेश सरचिटणीस अशा विविध पदांवर ते कार्यरत आहेत.
लोणार सरोवर पासून अवघ्या पाच किमीवर निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या हॉटेलला पर्यटक, फॅमिली ग्रूप व शाळेच्या सहली नेहमीच भेट देत असतात.डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असेल तर छोट्या व्यवसायातुनही मोठी भरारी घेता येते हे या राठोड दाम्पत्यांनी दाखवून दिले आहे.त्यांच्या या कामात त्यांच्या मातोश्री सुशीला बाई राठोड यांचाही खूप मोठा हातभार असल्याचे ते सांगतात.त्यांचा हा प्रवास इतर नव व्यावसायिकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारा आहे.